Love Marriage News: मुलांचे लग्न व्हावे त्यांचे दोनाचे चार हात होऊन नातवंडांचे तोंड पाहावे, घराचे भरले गोकूळ व्हावे, यासाठी मुलामुलींचे आईवडील काय काय नाही करत. अनेकदा तर ते देव पाण्यात घालून बसलेले असतात. पण कोल्हापूर जिल्ह्यात चक्क त्याच्या उलट घटना घडली आहे. येथील आई-वडीलांनी चक्क मुलीचे लग्न होऊ नये यासाठी गाऱ्हाने घातले आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी तांत्रिकाची मदत घेऊन चक्क जादूटोणा (Black Magic) आणि अघोरी (Aghori Baba) प्रकारही केला आहे. राहुल पोवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. प्राप्त फिर्यादीवरुन आजरा पोलीसांनी भोंदू बाबा आणि व रेश्मा बुगडे, शामराव बुगडे (रा. मलिग्रे, ता. आजरा) सुनील निऊंगरे कागिनवाडी (ता. आजरा) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
गावातील तरुणाशीच मुलीचे प्रेमसंबंध
राहुल पोवार, रेश्मा बुगडे, शामराव बुगडे हे तिघेही आजरा तालुक्याती एकाच गावचे रहिवासी आहेत. बुगडे यांच्या मुलीचे पाठिमागील काही महिन्यांपासून फिर्यादी राहुल पोवार या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाची कुणकुण मुलगा आणि मुलगी अशा दोघांच्याही कुटुंबीयांना लागली होती. त्यातून मुलाने गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींना मद्यस्थी घालून मुलीला विवाहाची मागणी घातली. त्यासाठी ते तिच्या घरीही गेले. मात्र, मुलाला काहीही कामधंदा, नोकरी नसल्याने मुलीच्या आईवडीलांनी लग्नास नकार दिला. तसेच, आगोदर पोटापाण्याचा मार्ग निवड. काहीतरी कामधंदा कर त्यानंतरच लग्नाबाबत विचार करु असेही त्यांनी त्याला सांगितले.
गावच्या स्मशाणभूमीत पुरले मुला-मुलींचे फोटो
दरम्यान, मुलीचे प्रेमप्रकरण सुरुच राहिल्याने आईवडीलांनी हे न ठरलेले लग्न मोडण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या. त्यासाठी त्यांनी सुनील निऊंगरे नावाच्या एका तांत्रिकाची मदत घेतली. मांत्रिकाच्या सल्ल्याने त्यांनी दारु, मुलामुलींचे फोटो आणि चकमक असलेला कागद आणला. 29 सप्टेंबरला रात्री 9.30 च्या सुमारास हा मांत्रिक मुलीच्या आईवडीलांना स्मशानभूमीत गेऊन गेला. तेथे त्यांनी काहीतरी पुरले, अशी माहिती फिर्यादी राहुल पोवार याला त्याच्या मित्रांनी दिली.
आई-वडील, तांत्रिकाविरोधात पोलिसांत फिर्याद
राहुल याने घटनेची शाहनिशा करण्यासाठी स्मशानभूमी गाठली असता त्याला त्या ठिकाणी अपला फोटो आणि मुलीचा फोटो लिंबू आणि चंदेरी रंगाचा कागद असे साहित्य आढळून आले. त्यानंतर त्याने आजरा पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वीही अशा जादूटोण्याच्या विविध घटना घडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून आले आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.