भाजप राज्यसभेसाठी (Rajya Sabha) चौथा उमेदवार देणार नाही, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankula) यांनी दिली आहे. भाजपकडून महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी तीन नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात अशोक चव्हाण (Ashok Chavhan), मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे या नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेतील सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा (Milind Deora) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नावे जाहीर करण्यात आलेले नाही. तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांचे नाव जाहीर केले आहे. ( Rajya Sabha Election 2024: भाजपा कडून Ashok Chavan, Medha Kulkarni, Dr Ajeet Gopchade यांना महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी जाहीर)
भाजप नेते नारायण राणे यांना देखील पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता होती. पण, त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राणे लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची नाराजी दूर केली जाईल अशी चर्चा होती. दरम्यान भाजपाने 3 उमेदवार देण्याचे ठरवल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे.
आतापर्यंत पाच उमेदवारांची नावे समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज रात्रीपर्यंत एका उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना राज्यसभा खासदारकीसाठी अर्ज भरावा लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केलीये.