भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे घुमजाव, 'शिवसेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही'
Chandrakant Patil | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) पक्षासोबत जाण्याचा भाजपचा कुठलाही विचार नाही. माझे वाक्य उलटे करुन वाचले गेले, असे घुमजाव भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. यापुढच्या सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेले स्पष्टीकरण बरोबर आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास भाजप तयार असल्याचे वक्तव्य पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांकडून कोणताच प्रस्ताव एकमेकांना गेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे नेते आहेत. त्यांचा चेहरा वापरुन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांमध्ये उमेदवार निवडूण आणायचे आणि पुढे निर्णय बदलायचा. असे चालणार नाही, असा टोलाही पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

चंद्रकांतपाटील यांनी ज्या वक्तव्यावरुन हे स्पष्टीकरण दिले त्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठीच खळबळ उडवून दिली होती. राज्याच्या हितासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेनेसोबत जायला तयार आहे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. (हे ही वाच, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे खंडण म्हणाले 'शिवसेना भजापमध्ये कोणताही प्रस्ताव नाही')

दरम्यान, काही वेळातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतो देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत दोन्ही पक्षांमध्ये अशी कोणताही चर्चा अथवा प्रस्तव नाही. भाजप हा आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात हे वक्तव्य केले, असा खुलासाही फडणवीस यांनी केला होता.