Chandrakant Patil on Ajit Pawar: मला 'चंपा' म्हणनं बंद करा नाहीतर मी सुद्धा..; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवार यांना इशारा
Chandrakant Patil , Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अजित पवार यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. राज्यात सत्ताबदल होणार आहे आणि ते कसा होणार आहे हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यांनी मला 'चंपा' म्हणने बंद करावे. नाहीतर मी देखील त्यांच्या मुलापासून कुटुंबीयांपर्यंत नावावरुन काहीबाही म्हणेन, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ही निवडणूक भारतीय जनता पक्षच जिंकेल हा विश्वास आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पायाखालची वाळू सरकली की लोकांच्या जिभेवरचा ताबा सुटतो, ते काहीही बोलत सुटतात. असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.

चंद्रकांत पाटील हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. पोटनिवडणुकीतही अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या फार महत्त्व नसलेल्या लोकांच्या घरी जावे लागले. खरे तर असे वागणे हा अजित पवार यांचा स्वभाव नाही. तो स्वभाव शरद पवार यांचा आहे. मात्र, या निवडणुकीत अजित पवार यांचे बदललेले वर्तन म्हणजे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचे निदर्शक आहे, असे पाटील म्हणाले. (हेही वाचा, Pandharpur By-election 2021: गायक आनंद शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांना गाण्यातून टोला म्हणाले 'पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय' (Video))

शरद पवार यांच्यावरील माझी पीएचडी अपूर्ण आहे. पण आता मी अजित पवार यांच्यावरही एमफील करणार आहे. त्यासाठी काही प्राध्यपकांना भेटून चर्चा करणार आहे की, इतके सगळे करुनही अजित पवार हे इतके छातीठोकपणे कसे काय बोलू शकतात. राज्यात कोणताही साखर कारखाना बंद पडला की ते पवार घेत असतात. खरं म्हणजे पवार कुटुंबीयांकडे किती कारखाने आहेत याचि श्वतपत्रीकाच काढायला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. अजित पवार यांच्यावर अनेक आरोप आहेत सिंचन घोटाळा ते इतर घोटाळ्यांपर्यंत अजूनही चौकशी पूर्ण नाहीअसेही पाटील म्हणाले.

राज्यात कोणाचेही सरकार असले तरी अजित पवार हेच मुख्यमंत्री राहतील. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले तरीही तेच आणि उद्या कम्युनिस्टांचं सरकार आलं तरीही अजित पवारच मुख्यमंत्री असतील, असा मिश्कील टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. कालचक्र नेहमी फिरत असतं. जे तुम्हाला तेच आम्हालाही लागू आहे. त्यामुळे अजित पवार जास्त गमजा मारु नका. माणसाने नेहमी नम्र असावं. जर सरकार स्थिर असेल ते पडणार नसेल तर इतके अकांडतांडव कशासाठी करायचे? असा सवलही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.