BJP Split in Mira Bhayandar: मीरा-भाईंदर भाजप दुफळीची राजकीय वर्तुळात चर्चा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष्य
BJP flags (Photo Credits: IANS)

मीरा-भाईंदर भाजप दोन गटात विभागली (BJP Split in Mira Bhayanda) गेल्याचे चित्र आहे. माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) आणि त्यांचा गट पक्षावर नाराज असून त्यांनी स्वपक्षीयांविरोधातच बंड केल्याचे बोलले जात आहे. मीरा भाईंदरमध्ये (Mira Bhayanda) भाजपमद्ये माजी आमदार नरेंद्र मेहता आणि नूतन शहराध्यक्ष रवी व्यास यांचा असे पक्षांतर्गत दोन गट आहे. त्यामुळे स्थानिक भाजप दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. दोन्ही नेत्यांनी एका कार्यक्रमाबाबत व्यक्त केलेल्या विधानांवरुनही ही बाब अधिक ठळकपणे पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी एका कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना शहराध्यक्ष रवी व्यास यांनी म्हटले की, नरेंद्र मेहता यांचा हा वैयक्तिक कार्यक्रम आहे. पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील ही दुफळी नेतृत्वाची डोकेदुखी ठरणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठिमागील काही दिवसांपूर्वी रवी व्यास यांची मीरा भाईंदर शहराध्यक्ष म्हणून घोषणा केली होती. या निवडीमुळे आमदार नरेंद्र मेहता गट नाराज झाल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरु होती. त्यानंंतर नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यावर रवी व्यास यांनी दिलेली प्रतिक्रिया अधिक ठळकपणे पुढे आली. या प्रतिक्रेयवरुनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली की, मीरा भाईंदर भाजपामध्ये सर्वच काही अलबेल नाही. (हेही वाचा, Geeta Jain: मीरा-भाईंदरमध्येही भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता; अपक्ष आमदार गीता जैन उद्या शिवसेनेत करणार प्रवेश)

नरेंद्र मेहता यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केल्याची जोरदार चर्चा आहे. मेहता यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या मेळाव्यात त्यांनी शहराध्यक्ष रवी व्यास यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे टाळले. उलट 'माझा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला अधिक विश्वास आहे' असे त्यांनी म्हटले. भाजप बळकट करण्यासाठी आपण हा मेळावा आयोजित केल्याचेही त्यांनी म्हटले.