राज्यातील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर सातत्याने विरोधकांकडून केले जाणारे भ्रष्टाचाराचे आरोप. महाविकासआघाडीमधील नेत्यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून वारंवार टाकल्या जाणाऱ्या धाडी यांमुळे राज्यातील सत्ताधारी वर्गात एक प्रचंड असंतोष आहे. हा असंतोष शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजववरही (Shiv Sena on BJP) जोरदार निशाणा साधला आहे. सामनातील लेखात टोला लगवातना शिवसेनेने भाजपची तुलना तालिबानशी (Taliban) करत 'भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं आहे', असा टोला लगावला आहे.
शिवसेना उपनेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माजगाव येथील निवास्थानी आयकर विभागाने छापेमारी केली. तत्पूर्वी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या हे दिल्लीला पोहोचले आहेत. दिल्ली येथे त्यांनी विधान केले की, महाविकासआघाडीतील काही नेत्यांचा उल्लेख 'डर्टी डझन' असा केला आहे. या 'डर्टी डझन' भ्रष्ट नेत्यांविरोधात आपण ईडीला पुरावे देणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Shivsena On BJP: केंद्रीय तपास यंत्रणा आता नाझी सैन्याप्रमाणे काम करत आहेत, शिवसेनेची सामनातून टीका)
‘शिखंडीचे युद्ध’ या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात भाजपवर शरसंधान साधतना शिवसेनेने म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपानेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. पण हातर शिखंडी प्रयोग असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे ‘डर्टी पाच डझन’ नेते तुरुंगात जाणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या करतात. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून आणि वापरूनच हे करणार ना? मग तुमचे ‘डर्टी डझन’ त्या वेळेला काय सिमल्याच्या बर्फात स्वर्गसुखाचा आनंद घेत बसणार आहेत का? किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा ‘झाड’ घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल. पोलीस भरती घोटाळाही रटरटून शिजलाच आहे. आता सुरुवात झालीच आहे तर तुमचेही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत,असा टोलाही लेखातून लगावण्या आला आहे.