Eknath Khadse | (File Photo)

महाराष्ट्राच्या राजकारणात काल (23 ऑक्टोबर) ऐतिहासिक दिवस ठरला. भाजपचे (BJP) विश्वासू आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला. या धक्कादायक घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून गेले. राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ऐकून घेण्यास सर्व प्रसारमाध्यमे उत्सुक होते. त्यात भारतीय जनता पक्षाला राज्यातले सरकार पडेल असे वाटत आहे मात्र तसे काहीही होणार नाही असे एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

त्याचबरोबर 'अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे आणि त्यांना रोखण्यासाठी पार्टीकडून सांगितले जात आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार आहे. मात्र, राज्य सरकार पडणार नाही.' असेही ते यावेळी म्हणाले. हेदेखील वाचा- Eknath Khadse Joins NCP: शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काल एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांची मुलगी रोहिणी आणि निवडक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

'शरद पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की मी गेली 40 वर्षे ज्या निष्ठेने भाजपाचे काम केले, त्याच निष्ठेने मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करेन' असे एकनाथ खडसे यांनी शरद पवारांना या कार्यक्रमात सांगितले. मी भाजपा पक्ष वाढवला, तसाच आता राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवेन. मी पक्षाचा विस्तार करून दाखवेन. मला फक्त तुम्हा लोकांची साथ हवी आहे असेही ते यावेळी म्हणाले.