Sanjay Raut on Ashok Chavan and BJP: महात्मा गांधी यांचा विचार राबवत भाजपकडून काँग्रेस पक्षाचे शुद्धीकरण- संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

BJP Purifying To Congress: काँग्रेसमुक्त भारताचे भाजपचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. त्या उलट भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना आपल्याकडे घेऊन एक प्रकारे महात्मा गांधी यांचा विचार राबवत काँग्रेस पक्षाचे शुद्धीकरण सुरु केले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (UBT) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासारख्या नेत्यांवर आदर्श प्रकरणात आरोप करणारे भाजपचे हेच लोक होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ज्या पद्धतीचे राजकारण करत आहेत, ते पाहता त्यांना जनतेमध्ये तोंड दाखवायलाही जागा नाही, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

भ्रष्टाचाराचा आदर्श भाजपमध्ये जाणार

भाजपमुळे काँग्रेस पक्ष शुद्ध होतो आहे. आदर्श घोटाळा प्रकरणात येथेच्छ आरोप करणारेच आज  अशोक चव्हाण यांना पक्षप्रवेश देत आहेत. याच नांदेडमध्ये घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श प्रकरणावरुन आरोप केले होते. त्याच चव्हाण यांचे कौतुक आता भाजपवाले करणार आहेत काय? ज्या शहीद जवानांसाठीच्या भूखंडावर उभा असलेल्या इमारीतींच्या फ्लॅट्समध्ये चव्हाण यांनी घोटाळा केल्याचे नाव आले. त्या शहीद जवानांच्या विधवांचा आक्रोश आणि जवानांचे शाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला. (हेही वाचा, Ashok Chavan on BJP: काँग्रेस सोडण्याचे कारण काय? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर)

महाविकासआघाडीचे लोकसभा जागावाटप शेवटच्या टप्प्यात

महाविकासआघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. काही जागांवर चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत मराठवाड्यासह जवळपास 40 जागांवरील बोलणी पूर्ण झाली आहेत. उर्वरीत जागांवर लवकरच तोडगा निघेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जागाटवाटपामध्ये कोणी कोणत्या जागेवर हक्क सांगत नाही. शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी, असे आम्ही सर्वजण एक आहोत. त्यामुळे ज्या जागेवर जिंकण्याची ताकद अधिक ती जागा त्या पक्षाची असे आमचे गणित असते, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Ashok Chavan Quit Congress Likely to Join BJP: अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा पंजा; भाजपच्या कमळाला हात देण्याची शक्यता)

शिवसेना (UBT) जागांवर लढेल

शिवसेना (UBT) 23 जागांवर लढेल. अर्थात त्यावर अजूनही बोलणी सुरु आहेत. मात्र, मराठवाड्यातील लोकसभेचे सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उमेदवार लवकरच जाहीर करतील. संभाजीनगरची जागा आम्हीच लढू आणि जिंकू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. संभाजीनगरची जागा भाजप लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी केंद्रीय नेते औरंगाबादध्ये येत आहेत, याबाबत विचारले असता, राऊत म्हणाले, त्यांनी केंद्रीय नेतेच काय जो बायडेन यांनाही प्रचाराला बोलवावे आणि लढावे. तरीही संभाजीनगरची जागा शिवसेना (UBT) च जिंकेल, असा टोला राऊत यांनी लगावला.