नागपूर शहरात राहणारे नागरिक नारायण भाऊराव दाभाडकर ( Narayan Dabhadkar) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित एका रुग्णासाठी रुग्णालयाती आपला बेड सोडल्याचे एक वृत्त काही प्रसारमाध्यमांतून झळकले. हे वृत्त प्रसारमाध्यमांतून येताच नारायण दाभाडकर (Narayan Dabhadkar) हे कसे 'रिअल हिरो' आहेत हे सांगणारीही बरीच वृत्त प्रसारमाध्यमांतून आली. या वृत्ताच्या सत्यतेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, भाजप (BJP) पॅनेलिस्ट अवधूत वाघ Avdhut Wagh) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केलेल्या या विधानात त्यांनी थेट “आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही” असे म्हटले आहे. वाघ यांच्या विधानावरुन आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सांगितले जात आहे की, दाभाडकर हे 85 वर्षीय गृहस्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. दाभाडकरांनी केलेल्या बेड त्यागामुळे आणि दाखवलेल्या अनोख्या दातृत्वामुळे भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या अनेक मंडळींनी त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर दाभाडकर यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. दाभाडकर यांचे समर्थन आणि कौतुक करणाऱ्यांप्रमाणेच दाभाडकरांबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचेच खंडण करणारही अनेक युजर्स सोशल मीडियावर आढळतात. यात वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या विधानामुळे वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
अवधूत वाघ यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतांवरुन वाद वाढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख थेच विष्णूचा अवतार असा केला होता. याशिवाय मराठी अभिनेत्यांबद्दलही त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडयावर जोरदार चर्चा झाली होती. प्रसारमाध्यमांतूनही वाघ यांच्या विधानावर चर्चा घडल्या होता. त्यामुळे वाघ यांचा पुर्वेतिहास पाहता अधून मधून ते अशी वादग्रस्त विधाने करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही.......
— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) April 29, 2021
दरम्यान, दाभाडकर यांनी केलेल्या कथीत बेड त्यागाची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनीही घेतली. त्यांनी सोशल मीडियावरुन दाभाडकर यांचे कौतुक करत ट्विट केले होते.