Sanjay Kaka Patil

भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार चर्चेत आले. ही चर्चा कमी होते न होते तोवर सांगली येथील भाजप खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil ) यांनी ईडी (ED) बाबत विधान केले आहे. माझ्यामागे कधीच ईडी लागणार नाही. कारण मी भाजप खासदार आहे. हे मी जाहीरपणे बोलतो आहे. हवे तर रेकॉर्ड करुन घ्या असे संजय पाटील यांनी म्हटले आहे.

विटा येथील एका आयोजित कार्यक्रमात संजयकाका पाटील हे शनिवारी (23 ऑक्टोबर) बोलत होते. संजय काका पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय पाटील यांनी मंचावरुन बोलताना म्हटले की, मी भाजप खासदार आहे. त्यामुळे ईडी आमच्याकडे फारशी येणार नाही. आणि जरी आलीच तरी आमची कर्ज पाहून ईडी म्हणेल की, ही माणसं आहेत की काय आहेत. संजयकाका यांच्या भाषणापूर्वी काही स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि त्यांची संपत्ती याबाबत काही विधाने केली होती. हा धाका पकडून खासदार पुढे बोलत होते. या वेळी मंचावर शिवसेना आमदार अनिल बाबर, वैभव पाटील आणि इतर उपस्थित होते. (हेही वाचा, Harshvardhan Patil On BJP: भाजपमध्ये शांत झोप लागते.. कोणतीही चौकशी नाही, काही नाही.. त्यामुळे मी आनंदी- हर्षवर्धन पाटील (Video))

व्हिडिओ

भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेसुद्धा ईडीबाबत विधान करुन काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते की, ''आमदार साहेब म्हणाले मी आहे तिथे सुखी आहे. तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. माऊली आमच्या शेजारी बसल्या आहेत. स्टेज गमतीशीर आहे. आता आम्हलाही भारतीय जनता पक्षात जावे लागले. ते म्हणाले का गेला? मी म्हणालो ते तुमच्या नेत्याला विचारा. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले? ते म्हणाले, तेवढं सोडून बोला. पण मी तुम्हाला सांगतो, काही नाही.... मस्त आहे निवांत आहे. भाजपमध्ये असल्याने शांत झोप लागते. काही चौकशी नाही काही नाही. मस्त वाटतंय''.

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन भाजप राज्यातील आणि एकूण देशभरातीलच विरोधकांना लक्ष्य करत आहे, असा आरोप अनेकांनी या पूर्वीच केला आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा तर राज्यातील काही भाजप नेते महाविकासआघाडी सरकारमधील नेते, मंत्री यांच्यावर आरोप करतात. त्यानंतर अल्पावधीत किंवा काहीच आठवड्यांमध्ये त्या नेत्यांच्या घर, कार्यालय अथवा कंपन्यांवर आयकर विभाग, सीबीआय आणि इतर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडतात. देशभरातही असे चित्र अनेकदा दिसले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील, खासदार संजयककाक पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या सत्यच सांगितले की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.