Jalgaon District Bank Election: भाजपला धक्का, खासदार रक्षा खडसे,  स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद; जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत NCB पारडे जड
Raksha Khadse | (Photo Credits: Facebook)

जळगाव जिल्हा बँक निवडणूक (Jalgaon District Bank Election) मैदानात उतरण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले आहेत. भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज निवडणुकीत बाद झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे पारडे जळगाव (Jalgaon) जिल्हा बँकेत जड झाल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर या निवडणुकीत राष्ट्रवादी बाजी मारेल हे जवळपास निश्चित झाले आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसे यांनी ओबीसी प्रवर्गातून तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दोघींचेही अर्ज बाद झाल्याने मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात आता केवळ एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज बाकी आहेत. त्यातही रोहिणी खडसे आपला अर्ज मागे घेणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध होईल असे मानले जात आहे. (हेही वाचा, OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन खडाखडी, रोहिणी खडेसे यांची टीका रक्षा खडसे यांच्याकडून प्रत्युत्तर)

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात आता केवळ एकनाथ खडसे आणि बोदवड मतदारसंघात अॅड. रविंद्र पाटील व रोहिणी खडसे यांचे अर्ज राहिले आहेत. त्यातही रोहिणी खडसे आणि अॅड. रविंद्र पाटील हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकाचा अर्ज मागे घेतला जाईल. त्यामुळे एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही जागा बिनविरोध निवडल्या जातील.

दरम्यान, भाजपच्या दोन उमेदवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचाही अर्ज बाद झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा निवडणूक अर्ज छाननीत बाद झाल्याने डमी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रमण भोळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.