MNS-BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) जवळ येत असताना मुंबईकरांची मते जिंकण्यासाठी सर्वच पक्ष वेगवेगळे अजेंडे घेऊन समोर येत आहेत. मात्र आगामी बीएमसी निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्याने शिवसेनेने महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत भाजप विजयासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. भाजप गेल्या वर्षभरापासून बीएमसी निवडणुकीची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांनी निविदा काढताना घेतलेल्या कथित कमिशनसारखे विविध घोटाळे त्यांनी उघडकीस आणण्यास सुरुवात केली.

आता FPJ ला दिलेल्या मुलाखतीत आमदार मिहीर कोटेचा (MLA Mihir Kotecha) यांनी बीएमसीमध्ये भाजप शिवसेनेला कसे पराभूत करणार आहे आणि मुंबईकरांसाठी त्यांची कोणती आश्वासने आहेत हे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती (BJP-MNS Tie-Up) होणार नसल्याचे स्पष्ट केले. पाडव्याला केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला होता, त्यावरून भाजप आणि मनसे एकत्र येणार की काय अशी शक्यता वर्तवली जात होती

त्यावर आता आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले की, भाजप एकट्याने निवडणूक लढवणार आहे व सध्या कोणत्याही राजकीय पक्षासोबत नवीन युती होणार नाही, मनसेसोबतही नाही. आमचे विद्यमान भागीदार म्हणजे आरपीआय आणि स्वाभिमानी पक्ष, जे आमचे सध्याचे भागीदार आहेत, ते आमच्यासोबत असतील. पण नवीन युती होणार नाही. यावरून आता भाजप आणि मनसे एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोटेचा म्हणाले, ‘आम्ही स्पष्ट बहुमताने सत्तेत येऊ, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे युती करण्याचा किंवा बाहेरून पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ (हेही वाचा: BMC Elections 2022: मनसे-भाजप युती होणार का? मुंबईतील भाजप नेत्याने काय म्हटले पाहा)

राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मशिदींवरील मोठ्या आवाजातील अजानबाबत कोटेचा म्हणाले, ‘आम्ही हा मुद्दाही उपस्थित केला आहे, जर मशिदी नियमांचे उल्लंघन करत असतील तर कारवाई करावी लागेल. कारण पहाटे पाच वाजता 110 किंवा 115 डेसिबलवर अजानची प्रार्थना करता येत नाही. जर हिंदू धार्मिक कार्यक्रमांसाठी ध्वनी प्रदूषणाचे नियम लागू होतात, तर मशिदींसाठी का नाही?’ (हेही वाचा: वसंत मोरे यांना पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवले,साईनाथ बाबर यांच्यावर नवी जबाबदारी; राज ठाकरे यांचा मोठा निर्णय)

दरम्यान, मिहीर कोटेचा हे भाजपचे महाराष्ट्राचे कोषाध्यक्षही आहेत. त्यांनी 1993 पासून भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) मध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि 2007 मध्ये त्यांची BJYM चे मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2014 मध्ये त्यांची मुंबई भाजप उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सध्या ते बीएमसी निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक समितीचे विशेष निमंत्रित आहेत.