BMC Elections 2022: मनसे-भाजप युती होणार का? मुंबईतील भाजप नेत्याने काय म्हटले पाहा
MNS-BJP Alliance | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Elections 2022) मनसे (MNS) आणि भाजप (BJP) यांच्यात युती (MNS-BJP Alliance) होणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबई येथील शिवाजी पार्क येथून केलेल्या भाषणानंतर ही चर्चा अधिकच वाढली. या चर्चेबाबत मुंबईतील भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांना विचारले असता त्यांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यामुळे मनसेसोबत युती करण्यास भाजप फारसा इच्छुक नसल्याचे चित्र सध्यातरी राजकीय वर्तुळात असल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात हिंदुत्त्ववादी भूमिका घेत मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, अल्पावधीतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे भाजप आणि मनसे एकत्र येण्याबाबत विचार सुरु असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पुढे येऊ लागल्या. राजकीय वर्तुळातही अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. आशिष शेलार यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. (हेही वाचा, Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भाषणावर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया)

आशिष शेलार यांनी मनसेबाबत भूमिका स्पष्ट करत म्हटले की, 'मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत भाजप युती करणार नाही. मात्र, एक निश्चित आहे की, मुंबईत भाजप स्वबळावर सत्ता आणून दाखवेल.' शेलार यांच्या वक्तव्यानंतर सध्यातरी मनसे भाजप युतीच्या विचारावा पडदा पडल्याचे चित्र आहे. आशिष शेलार यांनी या वेळी महाविकासआघाडीवरही मठ्या प्रमाणावर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, भाजप मुंबईमध्ये मनसेसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचे चित्र काही काळापूर्वी होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर स्पष्टच म्हटले होते की, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे मनसेने राष्ट्रीय पक्षासोबत युती करताना व्यापक भूमिका घ्यायला हवी. ती भूमिका घ्यायची तर त्यांनी परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडायला हवा, असे म्हटले होते. तेव्हाही मनसे-भाजप युतीच्या चर्चेला हवा मिळाली होती.