राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेशकर्ते झालेले आमदार शिवेंद्र राजे भोसेले (Shivendra Raje Bhosale) पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला निमित्त ठरले आहे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केलेले विधान. त्यासोबतच गेल्या काही काळात झालेल्या गाठीभेटी. शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि शिवेंद्र राजे भोसले हे जावळी तालुक्यातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. मात्र, एका कार्यक्रमात बोलताना 'शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे. त्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, मात्र गावांचा तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे', असे विधान केले, या विधानावरुनच जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच आमदार शिवेंद्रराजे यांनी शिवरूपराजे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. त्यातच शिवेंद्र राजे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात लवकरच ते यु-टर्न घेणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. दरम्यान, सातारा जिल्हा बँक निवडणूक लवकरच पार पडत आहे. या निवडणुकीपूर्वीच शिवेंद्रसिंह राजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा)
दरम्यान, या आधी शिवेंद्र राजे भोसले त्यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. या चर्चेवेळी त्यांनी माझी वाट लागली तरी चालेल. माझं सगळं संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सगळं संपविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे उद्गार काढत त्यांनी शशिकांत शिंदे यांना आव्हान दिले होते. मात्र, हे विधान करताना त्यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव घेतले नव्हते. तसेच, मी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवून निवडूण आलो आहे, असेही ते म्हणाले होते.
शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्र राजे भोसले यांच्या विधानावर संयमीत प्रतिक्रिया दिली होती. माझ्यात आणि शिवेंद्र राजे भोसले यांच्यात कोणतेही वाद नाहीत. आगामी सातारा जिल्हा बँक निवडणूक आम्ही सर्वांना सोबत घेऊन लढणार आहोत आणि ती बिनविरोध करणार आहोत असेही शिंदे म्हणाले होते. तसेच, शिवेंद्रराजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आगामी काळात काही खलबतं घडून शिवेंद्र राजे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातावर बांणार का याबाबत उत्सुकता आहे.