सिंधुदुर्ग मध्ये शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर आता दुसर्यांदा भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) जामिनासाठी अर्ज केला आहे. सुरूवातीला राणेंनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला होता हा जामीन फेटाळण्यात आला. त्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाहीच. अखेर नितेश यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आणि जामीन मागण्यासाठी खालच्या कोर्टात जा किंवा पोलिसांना शरण जा असे आदेश दिले आहेत त्यानुसार आता राणेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे.
काल सिंधुदुर्ग सत्र न्यायालयामध्ये जामीन नाकारल्यानंतर काही काळ राणे समर्थक आक्रमक झालेले पहायला मिळाले. नितेश यांचे बंधू निलेश राणे संतप्त झाले होते. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी कोर्टाबाहेर नितेश राणे यांचे वाहन अडवल्याचीही चर्चा होती.
नितेश राणे यांच्यासाठी त्यांचे वकील सतिश मानेशिंदे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून या आठवड्यामध्ये त्यावर सुनावणी होण्याची आशा आहे.
काय आहे प्रकरण?
संतोष परब यांच्यावर 18 डिंसेबरला कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.