सध्या राज्यात दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण (Mohan Delkar Suicide case) गाजत आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना मोहन डेलकर प्रकरणी सत्ताधारी विरोधकांवर टीका करत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. अशात भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. डेलकर कुटुंबियांना भेटण्यापूर्वी त्यांचे कोरोना चाचणी प्रमाणपत्र पाहिले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "25 आमदारांना कोरोना चाचणी नाही, म्हणून प्रवेश नाकारला! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रवेश नाकारला. डेलकर कुटुंबियांना भेटलात हे उत्तम, पण त्यांचे कोरोना चाचणी प्रमाणपत्र बघितले का उद्धवजी ? नियम सर्वांना सारखेच हवेत."
अतुल भातखळकर ट्विट:
२५ आमदारांना कोरोना चाचणी नाही, म्हणून प्रवेश नाकारला! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रवेश नाकारला.
डेलकर कुटुंबियांना भेटलात हे उत्तम, पण त्यांचे कोरोना चाचणी प्रमाणपत्र बघितले का उद्धवजी ? नियम सर्वांना सारखेच हवेत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 9, 2021
कोरोना चाचणी केली नसल्याने 25 आमदार आणि राज ठाकरे यांची भेट टाळणारे मुख्यमंत्री डेलकर कुटुंबियांना कसे भेटले? त्यांचे कोरोना रिपोर्टस तपासले होते? असे प्रश्न उपस्थित करत नियम सर्वांना सारखेच असतात, याचीही आठवण भातखळकर यांनी करुन दिली. दरम्यान, काल मोहन डेलकर यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर डेलकर यांच्या मुलगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांवर विश्वास व्यक्त केला. तसंच वडीलांना न्याय मिळण्याची आशा असल्याचेही तो म्हणाला.
यापूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेते अतुळ भातखळकर यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्या अटकेची मागणी केली होती.