भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर कवितेच्या माध्यमातून टिका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कविता ट्विट करून आशिष शेलार यांनी राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या शैक्षणिक गोंधळावर बोट ठेवलं आहे.
आशिष शेलार यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'कोरोना संकटामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच शिक्षणक्षेत्रातील अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. राज्यातील सरकारचा आधी घोषणा, मग निर्णय आणि नंतर अभ्यास असा कारभार सुरू आहे. परीक्षांबाबत राज्यात असलेल्या 11 विद्यापीठांचं एकसूत्र कसं ठरेल हा मोठा पेच आहे. राज्यात तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी असा लय भारी कारभार सुरू आहे,' असा निशाणाही आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर साधला आहे. (हेही वाचा - 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका)
शेतकरी हवालदिल, विद्यार्थी अधांतरी
रोजच्या रोज नवी अदला"बदली"
आधी घोषणा..मग निर्णय...
मग गृहपाठ... इथंच सगळी मेख
11 विद्यापीठांच कसं ठरणार सूत्र एक?
आता हाच एक सगळ्यात मोठा पेच!
तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी
तिघाडी सरकारचा कारभार...लय भारी!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 24, 2020
दरम्यान, मंगळवारी आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला गणेशोत्सवासंदर्भात पत्र लिहिलं होतं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यावर्षी गणेशोत्सव विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा? यासाठी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, मुर्तीची उंची व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतचे नियम अद्याप स्पष्ट न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जे संभ्रमाचे वातावरण झाले आहे, तसेच वातावरण गणेशोत्सवाबत निर्माण होऊ नये, म्हणून वेळीच शासनाने सुस्पष्ट शासन निर्णय गणेशोत्सवाबाबत जाहीर करावा, अशी मागणी आशिष शेलारांनी पत्रांद्वारे केली होती.