भाजप मेगा भरती 2019: काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) पक्षाला लागलेली गळती आणि भारतीय जनता पक्षात सुरु असलेली मेगा भरती थांबण्याचे नाव घेईना. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या कुंपणउड्या अद्यापही सुरुच असून, या उड्यांमुळे भाजप प्रवेशाला मेगा भरतीचे स्वरुप आले आहे. भाजप मेगा भरती (BJP Mega Recruitment 2019) प्रयोगाचे दोन अंक यापूर्वीच पार पडले आहेत. आज (11 सप्टेंबर 2019) दुपारी 3 वाजता मुंबईच्या गरवारे क्लब येथे या मेगा भरतीचा तिसरा अंक पार पडत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांच्यासह काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आणि सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील (Anandrao Patil) तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबईतील महत्त्वाचे नेते, माजी मंत्री गणेश (Ganesh Naik) नाईक हे 55 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील.
हर्षवर्धन पाटील यांच्या हातात भाजपचे कमळ
हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेश करण्याचे नक्की केल्याने काँग्रेस पक्षाला पुणे आणि इंदापूर तालुक्यात मोठा फटका बसणार आहे. गेले काही दिवस हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा होती. त्यातच पाटील यांनी काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार या चर्चेस अधिकच बळकटी मिळत गेली. अखेर स्वत: हर्षवर्धन पाटील यांनीच आपण भाजप प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद खच्ची
राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाची नवी मुंबई शहरात मोठी ताकद आहे. मात्र, राष्ट्रवादीला ताकदीची रसद पुरवणारे नेते गणेश नाईक हे पक्षाला सोडचिठ्ठी देत आज भाजप प्रवेश करत आहेत. गणेश नाईक यांचे पूत्र संदीप नाईक यांनी या आधीच आमदारकीचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला आहे. गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश नवी मुंबई वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. दरम्यान, गणेश नाईक यांच्यासोबत त्याचे पूत्र, माजी खासदार असलेले संजीव नाईक हेदेखील भाजप प्रवेश करणार का? याबाबत उत्सुकता आहे. नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५५ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपमध्ये येणार असल्याचा दावा केला जात आहे. (हेही वाचा, राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांचा 11 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश; सोबत 55 नगरसेवकही हाती घेणार कमळ)
आनंदराव पाटील यांच्या रुपात पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का
काँग्रेस नेते आणि विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील हेसुद्धा आज भाजप प्रवेश करत आहेत. आनंदराव पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कारण, पाटील हे चव्हाण यांचे विश्वासून मानले जात. दरम्यान, खासदार रणजित निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांनी या आधीच भाजप प्रवेश केला आहे. आता आनंदरावही भाजपमध्ये निघालेत. या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
कृपाशंकर सिंहांवर भाजपची कृपा
गेले प्रदीर्घ काळ सक्रीय राजकारणापासून दूर असलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजप प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यांचा भाजप प्रवेश आज पार पडेल अशी चर्चा आहे. दरम्यान, कृपाशंकर सिंह यांनी राजधानी दिल्ली येथे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खडगे यांच्याकडे काँग्रेस पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.