Lok Sabha Election 2024: विद्यमान भाजपा खासदारांचा पत्ता कट? राजकीय वर्तुळातच चर्चा, यादीही व्हायरल
BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महायुतीमधील (Mahayuti) प्रमुख असलेला भाजपा (BJP) आणि घटकपक्षांतील जागावाटपाची बोलणी अद्यापही सुरुच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shiv Sens) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांना किती जागा सोडायच्या यावरुन महायुतीमध्ये काथ्याकूट सुरु आहे. शिंदे आणि पवार गटातील अनेकांचा पत्ता जागावाटपात भाजपकडून कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केवळ मित्रपक्षांचाच नव्हे तर भाजपा विद्यमान खासदारांचाही (BJP Sitting MP) पत्ता कट करण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अनेक भाजपा खासदारांमध्ये चलबिचल सुरु आहे. पत्ता कापला जाणाऱ्या संभाव्य खासदारांच्या मतदारसंघांची पर्यायाने या खासदारांची एक यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये अनेक विद्यमान आणि तितक्याच मातब्बर खासदारांचा समावेश आहे.

भाजपकडून खासदारांच्या मतदारसंघात सर्व्हे

सांगितले जात आहे की,  भाजपने लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी आपल्या खासदारांच्या मतदासंघातून विविध सर्व्हे केले आहेत. ज्यामध्ये खासदारांच्या कामगिरीची पडताळणी करण्यात आली. मतदारसंघातील मतदारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियांवरुन या खासदारांच्या कामगिरीचा आढवा घेण्यात आला. ज्यामध्ये अनेक खासदारांबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. पडताळणीमध्ये आढळून आले की, काही खासदारांची कामगिरी चांगली नव्हती, काही खासदारांनी सलग तीन तीन वेळा लोकसभा मिळवली आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकाच व्यक्तीला वारंवार का संधी द्यायची? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकाच व्यक्तीला खासदार म्हणून संधी दिल्याने पक्षांतर्गत बंडाळी निर्माण होण्याची शक्याताही वर्तवली जात आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करुन भाजप यंदा खांदेपालट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, BJP's Sankalpa Patra Abhiyan: भाजप 'विकसित भारता'साठी 2 लाख मुंबईकरांकडून मागवणार सुचना; जाणून घ्या काय आहे 'संकल्प पत्र अभियान')

पत्ता कट होणाऱ्या खासदारांचे संभाव्य मतदारसंघ

बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, जळगांव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, अहमदनगर, धुळे, वर्धा, रावेर. अर्थात हे मतदारसंघ सोशल मीडियावर व्हायरल यादीत समाविष्ठ असले तरी भाजप नेतृत्वाने अद्याप तरी यावरुन कोणतेही भाष्य अधिकृतरित्या केले नाही. (हेही वाचा, Chhagan Bhujbal on Lok Sabha Election: आढावा सुरु आहे, जागावाटपानंतर उमेदवार निश्चिती- छगन भुजबळ)

भाजप डॅमेज कंट्रोल करणार?

दरम्यान, विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याचे धाडस भाजप दाखवत असला तरी, त्यातून अनेक राजकीय धोकेही पक्षाला सहन करावे लागू शकतात. सत्ता ही कोणालाही सोडावी वाटत नाही. परिणामी ज्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होईल, त्या खासदारांचा गट, कार्यक्रेत नाराज झाल्यास त्याचा निवडणुकीतल अधिकृत उमेदवारास फटका बसू शकतो. त्यामुळे तो बसू नये यासाठी भाजप कशा पद्धतीने डॅमेज कंट्रोल करतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.