Ram Kadam on Shiv Sena's Blood Donation Offer: 'म्हणून चिकन आणि पनीरचं आमिष दाखवून रक्तदान शिबीर भरवण्याची वेळ आली'; राम कदम यांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका
BJP Leader Ram Kadam ((Photo Credit: ANI)

कोविड-19 (Covid-19) संकट काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिवसेनेकडून (ShivSena) रक्तदान शिबिरांचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना चिकन किंवा पनीर मोफत देण्यात येत होते. शिवसेनेची ही ऑफर चर्चेत असताना आता भाजप नेते राम कदम (BJP Leader Ram Kadam) यांनी यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. "सरकारच्या निष्काळजीपणामुळे राजकर्त्यांवर चिकन आणि पनीर यांचं आमिष दाखवून रक्तदान शिबीर भरवण्याची वेळ आली आहे," असे राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मुंबई आणि महाराष्ट्रात रक्ताची कमतरता भासत आहे. यासाठी सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे आणि म्हणूनच राजकर्त्यांवर चिकन आणि पनीर देऊन नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करण्याची वेळ आली आहे." (Shiv Sena: रक्तदान करणाऱ्या नागरिकांसाठी शिवसेनेची भन्नाट ऑफर; मांसाहारींना मिळणार एक किलो कोंबडीचे मांस, तर शाकाहारींना पनीर)

राम कदम ट्विट:

रक्तदानाची गरज लक्षात घेत शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी रविवार, 13 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी मैदानावर हे शिबीर पार पडणार असून त्यासाठी 11 डिसेंबरपूर्वी नोंदणी करायची आहे. या शिबीरात रक्तदान करणाऱ्या शाकाहारी रक्तदात्यांना एक किलो पनीर आणि मांसाहारी रक्तदात्यांना एक किलो चिकन मोफत देण्यात येणार आहे. अशा आशयाचे बॅनर्सही स्थानिक भागात लावण्यात आले आहेत. दरम्यान, काळाची गरज लक्षात घेऊन नागरिकांना रक्तदान करण्यास स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे.