Kirit Somaiya | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Kirit Somaiya Offensive Video Real: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला होता. एका खासगी वृत्तवाहीणीने तर सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओंवर एक प्रदीर्घ कार्यक्रमच केला होता. यावरुन राज्याच्या राजकारणांत प्रचंड खळबळ उडाली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हे प्रकरण विरोधकांनी उचलून धरले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे त्यासंदर्भातील एक पेनड्राईव्हही दिला. या सगळ्यात एक मुद्दा उपस्थित होत होता, तो म्हणजे व्हिडिओची सत्यता काय? हा व्हिडिओ खरा आहे की मॉर्फ केलेला? दरम्यान, तपास पथकाने या व्हिडिओचा तपास करुन विश्लेषण केले आहे. या विश्लेषणात हा व्हिडिओ मॉर्फ केलेला नव्हे तर खरा असल्याचे आढळून आल्याचे वृत्त आहे. एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिणीने याबाबत वृत्त दिले आहे.

किरोट सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल कोणी केला?

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ खरा असल्याचे पुढे आल्यानंतर पोलीस आता आह व्हिडिओ नेमका कोणी व्हायरल केला याचा तपास करत आहेत. सोमय्या यांचा व्हिडिओ सर्वात प्रथम एका खासगी वृत्तवाहिनीने आपल्या वृत्तादरम्यान अत्यत अस्पष्ट पद्धतीने प्रसारीत केला होता. ज्या वृत्ताची दखल राज्यातील विरोधी पक्षांनी घेतली आणि राज्याच्या विधीमंडळात हा प्रश्न उचलून धरला. विरोधक आक्रमक झाल्यांनतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. राज्य महिला आयोग सदस्या रुपाली चाकणकर यांनीही या व्हिडिओची दखल घेऊन पोलिसांकडे अहवाल मागवला होता.

मुंबई क्राईम ब्रँच युनीट 10 कडे सोमय्या व्हिडओ प्रकरण

गृहमंत्र्याच्या आदेशानुसार सोमय्या व्हिडिओ प्रकरण मुंबई क्राईम ब्रँच युनीट 10 कडे सोपविण्यात आला. त्यांनी संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क केला आणि कथीत व्हिडिओ मागवले. त्यानंतर या व्हिडिओंचे विश्लेषण करण्यात आले असता व्हिडिओ खरे असल्याचे आढळून आल्याचे प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

सोमय्या व्हिडिओ प्रकरण विधिमंडळातही गाजले

विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी सोमय्या प्रकरणावरुन जोरदार आवज उठवला. अनेक मराठी भगिणी आणि महिलांनी सोमय्या यांच्याविरोधात आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याचे पुरावे आमच्याकडे आले नव्हते. तसेच, कोणाच्या खासगी आयुष्यात जाणे आम्हाला संयुक्तीक न वाटल्याने आम्ही हा मुद्दा कधीही उपस्थित केला नव्हता. परंतू, आता व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गोष्टी पुढे येत आहेत. त्याची चौकशी करावी, असे विरोधकांनी म्हटले होते. सरकारने ती मान्य केली.