Maharashtra State Commission for Women अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका- चित्रा वाघ
Chitra Wagh | (Photo Credits: Facebook)

भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून राज्य महिला आयोग (Maharashtra State Commission for Women) अध्यक्षपद रिक्त आहे. या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांनी कोणाचेही नाव न घेता, महिला आयोग 'अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ (Surpanakha) बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल', असे ट्विट करत राज्य सरकारला खोचक सल्ला देत टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, '' महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल''. चित्रा वाघ यांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच महाविकासआघाडीमधून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे. मात्र वाघ यांच्या ट्विटनंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, चंद्रपूर मधील दारुबंदी उठवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल)

ट्विट

चित्रा वाघ यांना नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणमध्ये संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून काही निवडक चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात चित्रा वाघ यांचे नाव आहे. चित्रा वाघ या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदांची जबाबदारी पार पाडली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याही होत्या. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ काहीशा आक्रमक झाल्या आहेत. खास करुन वनमंत्री संजय राठोड यांच्या कथीत ऑडीओ क्लिप आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मुंबई येथील बलात्कार प्रकरणातही त्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.