
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले. तसंच दारुबंदी उठवण्यामागची कारणंही त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दारुबंदी उठवण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाचे दूरागामी परिणामी होतील. कोविड-19 काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाने त्यांची प्राथमिकता काय आहे, हे दिसून येते, असेही ते पुढे म्हणाले. (चंद्रपूर जिल्ह्यात मागील 6 वर्षांपासून असलेली दारुबंदी अखेर उठवली)
तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विटद्वारे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ लिहितात. "दिवंगत नेते RRआबा यांनी ऊभी बाटली आडवी बाटली करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवट रिचवलीचं. भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या रहा परत चार हात करायची वेळ आणली या सरकारने आपल्यावर."
चित्रा वाघ ट्विट:

चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून दारुबंदी करण्यात आली होती. मात्र या निर्णयामुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री, सेवन आणि त्यासंबंधित गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली. तरुणाईला देखील दारुचे व्यसन लागले. महिला आणि लहान मुलंही या व्यवसायात आली. तसंच दारुबंदी हटवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. यामुळे झा समितीच्या अहवालानुसार आज दारुबंदी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.