Chandrakant Patil Criticizes Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडेल, आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही- चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil (Photo Credits: Twitter/ ANI)

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपसात भेट घेतली आहे. मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये यांची भेट झाली. तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. हे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडेल, आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

“आज संजय राऊत आणि देवंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांची भेट झाली की नाही याची मला माहिती नाही. राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधुनमधून भेटत असतात. त्याचा अर्थ त्यात काही उद्देश आहे आणि त्यातून बातमी निर्माण होईल असे नाही. आज भाजपा कार्यकर्त्यांचे एक मोठे वेबिनार होते. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. तसेच गेल्या नऊ महिन्यांत चर्चा सुरु आहे की, हे सरकार जाणार आहे. या चर्चेमध्ये कधीही देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमच्या कुठल्याच नेत्यांनी हे सरकार जाणार आणि आमचे सरकार येणार, असे म्हटलेले नाही. हे सरकार जाण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही. मात्र, आम्ही म्हणतो की, हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल. पण जेव्हा पडेल तेव्हा पडेल आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही.” हे देखील वाचा- Sanjay Raut and Devendra Fadnavis Meeting: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भेट; 2 तास चर्चा, समोर आले 'हे' कारण

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसले आहे. महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे मत विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर, हे सरकार केवळ पाच वर्ष नव्हेतर पुढील अनेक वर्ष सोबत राहणार, अशा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवला आहे.