ठाण्यातील भाजपचे नगरसेवक (Thane BJP Corporator) विलास कांबळे (Vilas Kamble) यांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात एका हॉटेलमध्ये कांबळे यांचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विलास कांबळे हे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. मात्र, हॉटेलमध्येच त्यांचा मृत्यू झाला. कांबळे यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. कांबळे यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन पाठवण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, हॉटेल व्यवस्थापनाला कांबळे यांच्या रुममधून दुर्गंधी आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यावेळी पोलिसांना कांबळे मृत अवस्थेत आढळले. कांबळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (हेही वाचा - अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल)
भाजप नेते निरंजन डावखरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन विलास कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'भाजपाचे ठाण्यातील नगरसेवक विलास कांबळे यांना विनम्र श्रद्धांजली. वागळे इस्टेट परिसरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने जागरूक होते. त्यांच्या निधनाने सामान्य जनतेचे नुकसान झाले. भावपूर्ण श्रद्धांजली' असं निरंजन डावखरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाचे ठाण्यातील नगरसेवक विलास कांबळे यांना विनम्र श्रद्धांजली. वागळे इस्टेट परिसरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने जागरूक होते. त्यांच्या निधनाने सामान्य जनतेचे नुकसान झाले.भावपूर्ण श्रद्धांजली
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) May 29, 2020
कोण होते विलास कांबळे?
विलास कांबळे आधी बसपमध्ये होते. मात्र, 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक 15 ड मधून ते नगरसेवकपदी निवडून आले होते. याशिवाय त्यांची पत्नी सुवर्णा कांबळे या देखील ठाणे महापालिकेत नगरसेविका आहेत. विलास कांबळे यांनी ठाणे महापालिकेत स्थायी समितीच्या माजी सभापतीचा पदभार सांभाळला होता.