अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
Akshay Borhade, Satyashil Sherkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Akshay Borhade Assault Case: विघ्नहर सहकारी साखर कारखाना (Vighnahar cooperative Sugar Factory) अध्यक्ष सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या शिरोली बुद्रुक परिसरात मनोरुग्णांची संस्था चालवत असलेल्या अक्षय मोहन बोऱ्हाडे (Akshay Borhade) या तरुणास मारहाण केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. सत्यशील शेरकर यांनी आपल्याला घरी बोलावून मारहाण केल्याचा आरोप अक्षय बोऱ्हाडे या युवकाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला होता. आपण चालवत असलेली मनोरुग्णांची संस्था अनधिकृत असल्याचा आरोप करत आपल्याला शेरकर यांनी मारहाण केल्याचा आरोप बोऱ्हाडे (Akshay Borhade) या युवकाने केला होता. हा प्रकार (27 मे 2020) या दिवशी घडाला होता. त्यानंतर काल (28 मे 2020) शेरकर यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, अक्षय बोऱ्हाडे या युवकाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सत्यशील शेरकर यांच्यावर आरोप करताना म्हटले होते की, जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी त्याला मारहाण केली. गेली 3 वर्षे मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असं वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा. मोठी मोठी दांडकी घेऊन मला मारहाण केली, असाही दावा या तरुणाने या व्हिडिओ केला आहे.

अक्षय बोऱ्हाडे याने केलेल्या आरोपाबाबत बोलताना सत्यशील शेरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सागितले की, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. अक्षय बोऱ्हाडे चालवत असलेल्या संस्थेत राहणाऱ्या मनोरुग्णांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. दोन दिवसांपूर्वीच त्याने एक मनोरुग्ण त्याच्या संस्थेत आणला होता. सध्या कोरोना व्हायरस संकटाचा काळ आहे. त्यामुळे त्या मनोरुग्णांची तपासणी जर केली नाही आणि त्यातला एखादा व्यक्ती पॉझिटीव्ह निघाला तर अवघ्या गावाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हा धोका त्याच्या निदर्शनास आणावा या उद्देशाने त्याला घरी बोलावले होते. मात्र, गावातील ग्रामस्थांचे ऐकूण घेण्यापेक्षा त्याने गावकऱ्यांनाच आरेरावीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. नंतर त्याने मी मारहाण केल्याचे आरोप माझ्यावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले. (हेही वाचा, अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण: खासदार अमोल कोल्हे यांनी दिली प्रतिक्रिया; उदयनराजे भोसले यांनीही सोशल मीडियावर व्यक्त केला संताप)

दरम्यान, अक्षय बोऱ्हाडे याला झालेल्या मारहाणीचे सोशल मीडियावर बरेच पडसाद उमटले. अगदी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, भाजप आमदार नितेश राने आणि इतरही अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. फेसबुकवरील अनेक युजर्सनीही बोऱ्हाडे याला झालेल्या कथीत मारहाण प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.