भिवंडी येथे भटके कुत्रे मोकाट, एकाच दिवशी दहा मुलांना चावल्याने परिसरात भीतीचे वातावरण
Street Dogs (Photo Credits-Facebook)

भिवंडी येथे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत चालले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तर एकाच दिवशी आठ ते दहा मुलांना चावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट पिसाळलेली कुत्रे स्थानिक नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी होतील अशी अवस्था करुन सोडत असल्याचा संताप नागिरकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिकेने या गोष्टीवर लवकरच तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.

पिसाळलेले कुत्रे एकाच दिवशी नागरिकांवर हल्ला करत आहेत. तर पुन्हा एकदा एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठ ते दहा जणांचा जावा घेतल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन-तीन जणांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांबाबत महापालिकेकडे तक्रार केली असता त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच भटक्या कुत्र्यांवर लवकरच आवर घालण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे.

तर काही दिवसांपूर्वी टिटवाळा येथे भटक्या कुत्र्याकडून एकाच दिवशी 20 स्थानिकांना चावा घेतल्याचा प्रकार समोर आला.  यामध्ये पिसाळलेल्या एका कुत्र्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना चावा घेतला होता. यामुळे काही विद्यार्थ्यांना हातापायाला जखमा झाल्या आहेत. एवढेच नाही तर काही स्रिया आणि पुरुषांना सुद्धा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. तर भटक्या कुत्र्यांच्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच महापालिकेने या प्रकरणी उपाय करावे अशी मागणी केली होती.