टिटवाळा (Titwala) येथे भटक्या कुत्र्याकडून एकाच दिवशी 20 स्थानिकांना चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांच्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच महापालिकेने या प्रकरणी उपाय करावे अशी मागणी केली जात आहे. परंतु महापालिका स्थानिकांच्या या मागणीकडे कानाडोळा करत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस टिटवाळा परिसरात वाढत चालली आहे. तर याच परिसरातील पिसाळलेल्या एका कुत्र्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना चावा घेतला आहे. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांना हातापायाला जखमा झाल्या आहेत. एवढेच नाही तर काही स्रिया आणि पुरुषांना सुद्धा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने सर्व जणांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु तरीही कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांसाठी एक प्रकारचा त्रास झाला आहे.
तसेच मुंबईत सध्या भटक्या कुत्र्यांच्याबाबत एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्यांचा काळाबाजार होत आहे. रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना रंग लावून ती एका विशिष्ठ जातीचे असल्याचे नागरिकांना भासवले जाते. त्यानंतर फक्त 500 रुपयात खरेदी केलेल्या या कुत्र्यांच्या पिल्लांना पक्का रंग लावून त्याची 10 हजार रुपयात विक्री केली जात असल्याची गोष्ट उघडकीस आली आहे. तर रविवारी बॉम्बे अॅनिमल राईट्स या संघटनेने या भटक्या कुत्र्यांच्या बाबतचा काळाबाजार समोर आणला होता. (महिन्याभरात पुण्यातील ट्रायडल नगर सोसायटीमध्ये 21 कुत्रे-मांजरी यांची हत्या, विषबाधेतून हत्या)