फिर्यादीच निघाला गुन्हेगार! भिवंडी मध्ये  युट्युब व्हिडीओ पाहून बार चालकाने स्वतःवरच घडवून आणला गोळीबार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

भिवंडी (Bhiwandi)  मध्ये मागील महिन्यात स्वीट हार्ट लेडीज ऑर्केस्ट्रा बारचा मॅनेजर अमोल बोऱ्हाडे (Amol Borhade) याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला होता.अलीकडे याप्रकरणी कोनगाव पोलीसांनी तपास करून इंदूर मधून दोन आरोपींना अटक केली होती. मात्र या आरोपींनी दिलेल्या माहितीतून याप्रकरणात वेगळाच ट्विस्ट आल्याचे समजत आहे. अमोल बोऱ्हाडे याच्यावर गोळीबार करण्याचा प्लॅन बनवणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः अमोलचा असल्याचे या आरोपींनी सांगितले आहे. अमोलने आपले मित्र कपिल कथोरे आणि इरफान शेख यांच्या मदतीने हा गोळीबार घडवून आणला होता. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील गावठी कट्टे जप्त केले आहेत.

28 मे च्या रात्री सुमारे 2.30  वाजता अमोल  आपल्या बार बाहेर सिगारेट पित उभा होता, यावेळी कपिल आणि इरफान यांनी दुचाकीवर येऊन त्याच्या मागून उजव्या खांद्यावर गोळी झाडली. यामध्ये अमोल जखमी झाला होता यासंदर्भात कोनगाव पोलीस स्थानकात रीतसर तक्रार देखील नोंदवण्यात आली होती. इंदूर मधून या गुन्हेगारांना हातात घेताच पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करायला सुरवात केली. यामध्ये पोलिसांना आरोपी आणि अमोल यांच्यातील मोबाइल रेकॉर्डिंग्स मिळाले, ज्यात अमोलने आरोपींना या प्रकरणातून सोडवण्याचे आश्वासन दिले होते. यावरून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अमोलच्या चौकशीला सुरवात केली आणि त्यातूनच हा प्रकार उघड झाला. गाझियाबाद: सॉफ्टवेअर इंजिनिअरचे कुटुंब झाले बेरोजगारीचे बळी, Whatsapp व्हिडियोवर केला गुन्हा कबुल

अमोल याने व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांकडून तब्बल साडे तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण ते वेळच्या वेळी फेडू न शकल्याने रोज देणेदारांच्या चौकशीला सामोरे जावे लागत असे यापासून काही दिवस सुटका मिळवण्यासाठी त्याने हा  डाव रचला होता. यासाठी त्याने युट्युब व्हिडीओ वरून कुठे गोळी लागल्यास जीव जाणार नाही याचा अंदाज घेतला आणि पूर्ण कट रचून आपल्या मित्रांच्या मदतीने तो पार पाडला. या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरु असून अमोल बोऱ्हाडे याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.