भीमा कोरेगाव हिंसाचार (File Photo)

कोरेगाव भीमा हिंसाचाराचे सुत्रधार संभाजी भिडे असून या प्रकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील जबाबदार असल्याचा दावा बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची आज सुनावणी होती. त्यावेळेस प्रकाश आंबेडकर आपली बाजू आयोगासमोर मांडली.

आपली बाजू मांडताना आंबेडकर म्हणाले की, 1 जानेवारी 2018 रोजी सकाळी पावणे दहाच्या दरम्यान हिंसाचारास सुरुवात झाली. याची माहिती मिळताच मी ताबडतोब पुणे ग्रामीण पोलिसांना संपर्क केला. मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.

तसंच या प्रकरणात मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना, पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस जबाबदार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले आहे.

सत्यशोधन समितीमार्फत सादर करण्यात आलेल्या अहवालाशी मी सहमत नसल्याचेही ते म्हणाले. पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पत्रात तफावत असल्याचेही आंबेडकरांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.