Bhima-Koregaon Violence (Photo Credits: PTI/File)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आज पुणे सत्र न्यायालयामध्ये पाच जणांवर आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन या पाच जणांचा आरोपपत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच एल्गार परिषदेमधील भाषण आणि प्रचार हा भीमा कोरेगाव हिंसाचाराला कारणीभूत असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी सुमारे ८० प्रत्यक्षदर्शीं तपासण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

आरोपपात्रात दाखल करण्यात आलेल्या पाचही जणांना एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी अटक केले होते. जून महिन्यात ही अटक करण्यात आली होती. अखेर आज त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सीपीआय माओवाद्याच्या रणनितीनुसार या पाच आरोपींनी दलितांची दिशाभूल करुन त्यांच्या मनात हिंसाचाराचे विचार पसरवले असा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला होता. एल्गार परिषदेला काही संशयितांनी आर्थिक मदतही केली असल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर लावला आहे. या पाच आरोपींव्यतिरिक्त २८ ऑगस्टला पुणे पोलिसांनी सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्नन गोन्सालविस, अरुण फरेरा आणि गौतम नवलखा यांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. ही धरपकड देशाच्या विविध भागातून करण्यात आली आहे.