Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Shatad Pawar) यांची भीमा कोरेगाव (Bhima Koregaon Case) प्रकरणी साक्ष होणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगासमोर येत्या 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी शरद पवार आपली साक्ष नोंदविण्यासाठी हजर राहणार आहेत. निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल हे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष आहेत. या आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही चौकशी पार पडती आहे. या वेळी समितीचे कामकाज पुण्याऐवजी मुंबई येथून पार पडणार आहे.

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2018 या दिवशी भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण घडले. या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना अटक झाली. तसेच, आरोप-प्रत्यारोपही झाली. याच प्रकरणात आता शरद पवार यांचीही साक्ष होणार आहे. शरद पवार यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. शरद पवार यांना साक्ष देण्याबाबत यापूर्वी समन्स बजावण्यात आले होते. (हेही वाचा, Bhima Koregaon Violence Case: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाला सहा महिन्यांची मुदतवाढ)

शरद पवार यांना भीमा कोरेगाव प्रकरणात या आधीही चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा शरद पवार यांना याच प्रकरणात साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, येत्या 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार हे आपली साक्ष नोंदवणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्याप्रमाणेच पुण्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनाही साक्षीसाठी बोलाविण्यात येणार आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले असल्याचे समजते.