Bharat Jodo Yatra | | (Photo Credit- twitter/IYC)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात जोरदार चर्चेत आहे. खास करुन अकोला येथील पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यमे आणि विरोधकांकडूनही त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राहुल गांधी यांची आज जंगी सभा पार पडत आहे. अकोला येथील कुपट बाळापूर येथील बाळापूर येथून पदयात्रा सुरु झाली आहे. ही यात्रा आज बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात प्रवेश करत आहे. दुपारी चार वाजता राहुल गांधी शेगाव येथील गजानन महाराज यांचे दर्शन घेतील. त्यानंतर याच ठिकाणी म्हणजेच शेगाव येथील सभेत राहुल गांधी भाषण करतील. आजच्या सभेत राहुल गांधी काय भाषण करतात याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महत्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हेदेखील आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारानंतर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या बाजूला याच पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या वंदना डोंगरे यांनी ठाणे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन राहुल गांधी यांच्या विरोधता गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षही आक्रमक झाला आरे. मनसेचे कार्यकर्ते सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना 149 अन्वये नोटीसाबजावल्याआहेत. कायद्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi On Savarkar: सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल)

शेगाव येथील सभा विक्रमी करण्यासाठी काँग्रेसही कामाला लागली आहे. या सभेसाठी काँग्रेसचेही दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक, भाई जगताप, नसीम खान, सुनील केदार, मिलिंद देवरा, दिपेंद्र सिंग गुड्डा यांच्याससह इतरही अनेक नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, मनसे नेत्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना फूल देऊ असे म्हणन नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, कोण मनसे? असा उपरोधीक सवालही विचारला आहे. दुसऱ्या बाजूला भारत जोडो यात्रा आणि राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणे म्हणजे केवळ मनसेचा स्टंट आहे. त्यापलिकडे त्याला काहीही महत्त्व नसल्याची प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली आहे.