Rahul Gandhi On Farmers At Nashik: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान, नाशिक येथील चांदवड (Chandwad) येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. विरोधकांची इंडिया आघाडी (India Aghadi) सत्ते आल्यानंतर ती शेतकऱ्यांचा आवाज होऊन होऊन काम करेन. त्यासाठी आम्ही सर्वजण धोरणे तयार करु, अशी स्पष्ट ग्वाही राहुल यांनी चांदवड येथील सभेतून दिली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या सुरू असलेल्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील शेतकरी आणि राजकीय कार्यकर्ते चांदवडला आले होते.
इंडिया आघाडी शेतकरी हिताचे निर्णय घेईल
शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना राहुल गांधी म्हणाले, इंडिया आघाडी सरकार शेतकऱ्यांचा आवाज असेल आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करेल. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक विमा योजनेची पुनर्रचना, शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी, निर्यात आयात धोरणे तयार करताना पिकांच्या किमतीचे संरक्षण करणे आणि जीएसटीमधून शेती वगळण्यासाठी प्रयत्न करणे आदी मुद्द्यांवर काम करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. (हेही वाचा, Mahila Nyay Guarantee Yojna: राहुल गांधींकडून 'महिला न्याय' हमी योजनेची घोषणा; गरीब महिलांना 1 लाख रुपये देणार, सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण)
राहुल गांधी यांच्याकडून एमएसपीचा पुनरुच्चार
वायनाड लोकसभा मतदारसंघाचा खासदार असलेल्या या नेत्याने स्वामीनाथन समितीच्या अहवालानुसार किमान आधारभूत किंमत (MSP) ला कायदेशीर हमी देण्याच्या काँग्रेसच्या वचनाचा पुनरुच्चार केला. देशातील 20 ते 25 लोकांकडे देशाच्या 70 कोटी लोकसंख्येइतकी संपत्ती असल्याचा दावा करतानाच नरेंद्र मोदी सरकारने उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असा दावाही त्यांनी केला. उद्योगपतींना कर्जमाफीसाठी दिलेली ही रक्कम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) 24 वर्षांच्या समतुल्य आहे. या योजनेंतर्गत अंतर्गत गरीब लोकांना रोजगार देण्यासाठी दरवर्षी 35,000 कोटी रुपये खर्च केले जातात, असेही गांधी म्हणाले (हेही वाचा : EC Advisory to Rahul Gandhi: पंतप्रधानावरील वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी यांना सल्लागार जारी, भविष्यात अधिक सावध राहण्याचा दिला सल्ला )
राहुल गांधी यांनी जोर देत सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने शेतकऱ्यांचे 70,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. श्रीमंतांची कर्जे माफ करता येत असतील, तर शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळाला पाहिजे, असे त्यांनी ठासून सांगितले. याच वेळी अग्निपथ योजनेवर (ज्याअंतर्गत सशस्त्र दलांद्वारे सैनिकांची अग्निवीर म्हणून नावनोंदणी केली जाते) टीका करताना ते म्हणाले अग्निवीरांना पेन्शन आणि शहीद दर्जा यातून वगळण्यात आले आहे आणि त्यांना फक्त सहा महिने प्रशिक्षण दिले जाते. जसे सैनिक आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे शेतकरी देशातील नागरिकांचे रक्षण करतात. जर आपण आपले जवान आणि किसान यांचे रक्षण केले नाही तर देशाची प्रगती होऊ शकत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.