राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयात बदली केली आहे. सध्या गोव्याच्या राजभवनचा अतिरिक्त कारभार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोव्याचे नवे राज्यपाल (Goa Governor) म्हणून येथे शपथ घेतली आहे. डोना पॉला, पणजी येथील राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती  दीपांकर दत्ता यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे. राज्यपालांनी आपली शपथ कोंकणी भाषेतून घेतली आहे.तसेच  शपथविधी सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व इतर मान्यवर उपस्थित होते.

महत्वाचे म्हणजे, गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार असलेले भगत सिंह कोश्यारी हे 5 सप्टेंबर 2019 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. याआधी 16 मे 2014 पासून तर 23 मे 2019 पर्यंत लोकसभेत नैनिताल -उधमसिंह नगरचे खासदार होते. लोकसभेआधी 26 नोव्हेंबर 2008 पासून 16 मे 2014 या कालावधीत ते राज्यसभेत भाजपचे खासदार होते. तसेच ते 30 ऑक्टोबर 2001 पासून 1 मार्च 2002 पर्यंत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. हे देखील वाचा- खुशखबर! महाराष्ट्रात आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ST Bus ला परवानगी

एएनआयचे ट्वीट-

मेघालयचे नवनियुक्त राज्यपाल सत्यपाल मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत जम्मू काश्मीरचे आणि ऑक्टोबरपासून बदलीचा आदेश निघेपर्यंत गोव्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. मलिक यांच्या कार्यकाळात कलम 370 हटवून केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे विभाजन केले होते. लडाख केंद्रशासीत प्रदेश करण्यात आला. जम्मू काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासीत प्रदेश करण्याचा निर्णय झाला आहे.