Bhagat Singh Koshyari |(Photo Credits: ANI/Twitter)

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात राज्याच्या तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी घेतलेले निर्णय कायद्याला आणि संविधानाला धरुन नव्हते, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिकेचा अर्थ लावताना आणि संबंधित खटल्याचा अंतिम निकाल (Supreme Court Verdict) देताना सर्वोच्च न्यायालयाने हे ताशेरे ओढले. यावर माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रथमच आपली भूमिका व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतान ते म्हणाले, राज्यपाल पदावर असताना आपण घेतलेले निर्णय हे विचार करुनच घेतले आहेत. मात्र, त्यावर न्यायालयाने काही निर्णय दिला असेल तर त्यावर भाष्य करणे माझे काम नव्हे, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.

भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे की, आपण कायद्याचा विद्यार्थी नाही. मी संसदीय परंपरा पाळणारा आणि त्या दृष्टीने विधायक निर्णय घेणारा व्यक्ती आहे. त्यामुळे राज्यपाल पदावर असताना मी जे काही निर्णय घेतले ते त्या त्या वेळी योग्य भूमिकेतूनच घेतले. जर कोणी राजीनामा घेऊन आला असेल तर त्याला मी नको कसे म्हणणार? असे सांगतानाच कोश्यारी पुढे म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करण्याचे माझे काम नव्हे. विश्लेषक त्यावर भाष्य करु शकतात, असे म्हणत कोश्यारी यांनी न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा, 'सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निर्णय' - उद्धव ठाकरे यांनी दिली सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया)

व्हिडिओ

कोर्टाने स्पष्ट भाषेत म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्णय घेताना राज्यपालांनी बेकायदेशीर वर्तन केले आहे. राज्यपालांनी घेतलेला बहुमताचा निर्णय हा चुकीचा होता. राज्यपालांनी घटनेची कोणतीही शहानिशा न करता निर्णय घेतले. खरे तर राज्यपालांनी कोणत्याही स्थिती राजकीपद्धतीने निर्णय घेऊ नये, असे तीव्र शब्दांमध्येही कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.