BEST कामगारांचे बेमुदत उपोषण सुरु; उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ
BEST | (Photo courtesy: ANI)

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या (BEST)  वेतन करारासह अनेक प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey)  यांचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने बेस्ट कामगारांनी वडाळा डेपोमधून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी मागील काही दिवसात बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने प्रशासनाला "आमचा अंत पाहू नका, अन्यथा संप हाच पर्याय उरेल असा निर्वाणीचा इशारा दिला होता.याप्रकरणी उद्धव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे उपोषण सुरु करण्यात आले आहे.तर दुसरीकडे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) व उद्धव ठाकरे हे सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission)  पार्श्वभूमी वर वेतन करार करण्याबाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार असल्याचं बेस्ट कामगार सेनेने जाहीर केलं.

मागील कित्येक दिवसांपासून बेस्ट कर्मचार्‍यांनद्वारे एप्रिल 2016 पासूनची प्रलंबित वेतनवाढ, मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पामध्येच सहभागी करण्याचं आणि बेस्ट कर्मचार्‍यांना पालिका कर्मचार्‍यांइतका बोनस देण्याची मागणी करण्यात येत होती. बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागणीचा विचार करता त्यांना आज, 27 ऑगस्ट रोजी प्रशासनाद्वारा चर्चेचे आश्वासन देण्यात आले होते. (BEST Strike : संपात सहभागी झालेल्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन)

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा संपाचा विचार मांडत कृती समितीने शुक्रवारी कर्मचाऱ्यांचे मतदान घेतले. यामध्ये 19 हजार कर्मचाऱ्यांपैकी 17 हजार 497 म्हणजे 98% कर्मचाऱ्यांनी संप करण्याच्या बाजूने कौल दिला, तर 368 कर्मचाऱ्यांनी संप करू नये असे मत दिले.या बाबत बेस्ट कामगारांनी आंदोलन करू नये म्हणून शिवसेना सचिव, आमदार अनिल परब आणि बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र त्यात काहीच उपाय न निघाल्याने वडाळा डेपो मधून संपाची सुरुवात करण्यात आली आहे.