मुंबई : बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सहावा दिवस आहे. मात्र अजूनही यावर काही ठोस तोडगा निघाला नाही. तब्बल सहा दिवस मुंबईकरांचे हाल होत आहेत, मात्र सरकार अजूनही शांतच आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या संपात सहभागी झालेल्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे आणि यावर सकारात्मक विचार केला जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प विलीन केला जावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सध्या बेस्ट तोट्यात चालली आहे, मात्र बेस्ट ही सेवा असल्यानी ती ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी काही सुधारणादेखील सुचवल्या आहेत ज्यांचा विचार आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले. (हेही वाचा : BEST Strike: सलग सहाव्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांची संपाची हाक)
यासाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी थोडे सबुरीने घ्यावे. त्यांनी अवास्तव मागण्या करू नये. बेस्ट तोट्यात असल्याने सरकारच्या तिजोरीवर याचा फार मोठा ताण पडत आहे. कर्मचारी वर्गाने जर अवास्तव मागण्या केल्या, तर त्यांचे पगार देणेही मुश्कील ठरू शकते असे ते म्हणाले. दरम्यान शिवसेनेच्या वतीने स्थानिक लोकाधिकार समिती महाअधिवेशन 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भाजपावर उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली. नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचा राम मंदिराला विरोध आहे. त्यांचा विरोध असताना त्यांना घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि काँग्रेसलाही विरोध करत मग राम मंदिर कसे बांधणार? असा सवाल उपस्थित करत; सेनेला पटकणारा अजून जन्माला यायचाय असा टोलाही लगावला.