BEST Bus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Flash Strike in Mumbai: बेस्ट कर्मचारी सलग दुसऱ्या दिवशी संपावर असल्याने मुंबईकर प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. ओव्हर टाईम, पगारवाढ आणि इतर सेवासूविधा यांबद्दलच्या विविध मागण्यांसाठी हा संप सुरु आहे. आज सकाळपासूनच घाटकोपर आगारातील कंत्राटी चालक सकाळपासून संपावर (BEST Bus Drivers Strike) गेले आहेत. संपाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून, देवनार, आणि, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास आगारातील कर्मचारीही संपवार जाण्याची चिन्हे आहेत. ज्यामुळे नोकरी आणि इतर व्यवसाय, उद्योगासाठी घराबाहेर पडणाऱ्या समान्य मुंबईकर नागरिकंना मोठा फटका बसताना दिसतो आहे.

कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पगारवाढ आणि बेस्ट सुविधा यांबाबतच्या मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला प्रज्ञा खजुरकर यांनी आझाद मैदान येथे सहकुटुंब उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ इतरही काही कर्मचारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी संपावर आहेत. हे कर्मचारी कंत्राटी आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर संप मागे घेणार नाही, मागे हटणार नाही अशी भूमिका हे बेस्टचे संपकरी कर्मचारी व्यक्त करत आहेत. (हेही वाचा, BEST Bus Strike: घाटकोपर, मुलुंड आगारामध्ये कंत्राटी कर्मचारी संपावर; वाहतूक सेवा विस्कळीत)

बेस्टकडे सध्या नऊ हजार कंत्राटी कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. हे कर्मचारी सध्या संपावर असल्याची माहिती कर्मचारी संस्थेने दिली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या नऊ हजारांमध्ये मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे 3 हजार, एसएमटी एटीपीएल असोसिएटचे दोन हजार, हंसा ग्रुपचे दीड हजार आणि टीएमएल ग्रुपचे दोन हजार ,ओलेक्ट्रा ग्रुपचे 500 इतके खासगी कंत्राटी कर्मचारी असल्याचे समजते. हे कर्मचारी संपावर ठाम राहिले तर घाटकोपर, देवनार, आणिक, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी आगार, सांताक्रुज आगार, मजास आदी आगारांमधील वाहतूक ठप्प होऊ शकते. ज्याचा परिणाम नागरिकांच्या वाहतूकीवर होऊ शकतो. त्यामुळे सरकारने या संपावर लवकरात लवकर तोडगा काढून मुंबईकरांना दिलासा द्यावा आशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.