BEST Bus Fire Incidents: बेस्ट बसच्या 400 TATA CNG Buses ताफ्यातून हटवल्या; एकाच महिन्यात 3 बसला आग लागल्याच्या घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला निर्णय
BEST BUS | PC: Twitter

मुंबईच्या रस्त्यांवर धावणार्‍या बेस्ट बसमध्ये आगी (BEST Bus Fire) लागण्याच्या घटनांमध्ये मागील काही महिन्यांत वाढ झाली आहे. सातत्याने हा अग्नितांडव समोर येत असल्याने आता बेस्ट कडून 400 गाड्या त्यांच्या ताफ्यातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या फेब्रुवारी महिन्यातच 3 बेस्ट बसना आग लागल्याचं समोर आलं आहे. या आगीच्या घटना सीएनजी बसमधील (CNG Buses) आहेत.

नुकतीच अंधेरी पूर्व भागातील आगरकर चौक जवळ एक बेस्ट बस पेटल्याची घटना ताजी आहे. 415 मार्गावरील ही बस प्रवाशांनी भरलेली होती पण सुदैवाने प्रवासी बसमधून उतरल्यानंतर आग लागली. इंजिन मध्ये स्पार्क झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नक्की वाचा: Andheri Bus Fire: अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ जंबो झेरॉक्ससमोर बेस्ट बसला लागली आग .

बेस्ट कडून करण्यात आलेल्या ट्वीट नुसार, टाटा सीएनजी बस मध्ये लागत असलेल्या आगीच्या घटना पाहता आता M/S Mateshwari Urban Transport Ltd च्या 400 बस आता रस्त्यावर उतरणार नाहीत. या बसच्या निर्मात्यांकडून आणि ऑपरेटर्स कडून पुन्हा आगीच्या घटना होऊ नयेत म्हणून योग्य ती पावलं उचलण्याचा प्रयत्न आहे.

मुंबई मध्ये बुधवार संध्याकाळपर्यंत बेस्ट बसच्या 35 लाख प्रवाशांनी 3270 बसमधून प्रवास केला असून त्यामधील 1300 बस या वेट लीज वर होत्या. अलीकडे, बेस्टने 260 बस चालवणाऱ्या दुसर्‍या वेट लीज ऑपरेटरला निलंबित केले आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांत बेस्टच्या ताफ्यात 650 हून अधिक बसेस कमी झाल्या आहेत.

मुंबई मध्ये सीएनजी बसला आग लागण्याची पहिली घटना 25 जानेवारी रोजी सी-51 मार्गावर घडली होती. सांताक्रूझ डेपोतून बाहेर पडल्यानंतर दुपारी 1.15 वाजता वांद्रेकडे जाताना चालकाला गिअर बॉक्समध्ये स्पार्क दिसला, जो शॉर्ट सर्किटमुळे झाला असावा असा अंदाज आहे. ही बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. दुसरी घटना ११ फेब्रुवारी रोजी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील चकाला जंक्शन येथे घडली. ही घटना दुपारी 3.15 च्या सुमारास घडली असून यात कोणीही जखमी झाले नव्हते.

या आगीच्या घटनांचा तपास सुरू आहे. तीनही घटनांमधील प्राथमिक निरीक्षणावरून इंजिनमधील स्पार्कमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.