BEST Bus (Photo Credits: PTI)

बेस्टचे (Best) किमान भाडे 5 रुपये झाल्यापासून समस्त मुंबईकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. महागाईने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना सरकारचा ही भेट खूपच दिलासा देणारी ठरलीय. त्यामुळे मुंबईकरांची पावले रिक्षा, टॅक्सी वरून बेस्ट कडे वळताना पाहायला मिळत आहे. बेस्टचे तिकिट दर कमी झाल्याने जे आतापर्यंत बेस्टच्या इतिहासात घडले नव्हते अशी गोष्ट घडली आहे. एका दिवसात तब्बल 5 लाख प्रवाशांची संख्या वाढवून बेस्टने हा जणू विक्रमचा केला आहे. मंगळवारी बेस्ट चे दर कमी होताच बेस्ट प्रवाशांच्या बाबतीत हा चमत्कार घडला.

बेस्टच्या स्वस्त प्रवासाचे मुंबईकरांनी जोरदार स्वागत केले. त्यामुळे मंगळवारपासूनच बेस्टमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली. यापूर्वी बेस्टने साध्या बसचे तिकीट आठ रुपये केल्याने प्रवासी नाराज होते. वाहतूककोंडी, कमी बससंख्या आदी कारणांमुळे प्रवासी बेस्टपासून दुरावले होते. पण स्वस्त तिकीट आणि नवीन बस सेवेत दाखल करण्याच्या घोषणेने मुंबईकरांनी पुन्हा बेस्टला साथ दिली आहे. त्याचे परिणाम तिकीटकपातीच्या पहिल्याच दिवसापासून जाणवू लागले.

हेही वाचा- मुंबई: खुशखबर! आजपासून BEST चा प्रवास स्वस्त, किमान बस भाडे फक्त 5 रुपये 

तिकिट दरांवरुन बेस्ट प्रवासी आणि कंडक्टर मध्ये होणारे वाद मंगळवारपासून दिसले नाही. याउलट कंडक्टर स्वत: प्रवाशांना तिकिट दर कमी झाल्याचे सांगून पैसे परत करत असल्याने कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये खेळी-मेळीचे चित्र पाहायला मिळाले. परिवहन विभागाने हा आढावा घेतला आहे.

प्रवाशांची ही जितकी आनंदाची बाब आहे, तितकीच आपल्याकडे पाठ फिरवलेले प्रवासी पुन्हा आपल्याकडे वळाले यामुळे परिवहन विभाग देखील आनंदीत झाला आहे.