Gram Panchayat Elections | (File Image)

बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी (Belgaum Municipal Corporation Election) आज (3 सप्टेंबर) मतदान पार पडत आहे. प्रदीर्घ काळ महापालिका कायदेशीर प्रक्रियेमुळे रखडली होती. अखेर ही निवडणूक जाहीर झाली आणि मतदानही आज पार पडते आहे. 6 सप्टेंबरला मतमोजणी असणार आहे. बेळगाव महापालिकेवर आपलाच झेंडा फडकविण्यासाठी महाराष्ट्र एकिकरण समिती (Maharashtra Ekikaran Samiti) रिंगणात उतरली आहे. बेळगाव (Belgaum ) महापालिकेचा गड कायम राखण्यासाठी मराठी भाषक एकवटले आहेत. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बेळगाववर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे बेळगावमध्ये कोण बाजी मारते याबाबत उत्सुकता आहे.

बेळगाव महापालिकेचे वैशिष्ट्य असे की, पालिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय पक्ष आपल्या चिन्हांवर लढत आहेत. सकाळी 7 वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. निवडणूक आणि कोरोना व्हायरस महामारी या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत प्रथमच ईव्हीएम मशीन वापरले जाणार आहे. त्यामुळे मतदारांसाठी हा अनुभवही नविण असणार आहे. निवडणूक चोख आणि विनाअडथळा पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 1826 निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एकूण 58 प्रभागांसाठी 385 उमेदवार मैदानात आहेत. (हेही वाचा, बाबो! Covid-19 चा नाश करण्यासाठी भाजप आमदार Abhay Patil यांनी केले होम-हवन; शहरभर काढली मिरवणूक (Watch Video))

रिंगणात उतरलेले पक्षनिहाय उमेदवार

भाजप- 55

काँग्रेस- 45

महाराष्ट्र एकीकरण समिती- 21

जे डी एस- 11

आम आदमी- 37

एआयएमआयएम- 7

अन्य- दोन

अपक्ष- 217

दरम्यान, बेळगाव महापालिकेसाठी मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या 428364 इतकी आहे. त्यापैकी पुरुष मतदार 213536 तर 214834 महिला मतदार आहेत. 1828 निवडणूक कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली ही निवडणूक पार पडणार आहे. प्रति मतदान केंद्र एक पोलीस आणि चार निवडणूक कर्मचारी तैनाती आहे. तसेच, बंदोबस्तासाठी शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, राज्य राखीव पोलीस दालाच्या सहा तुकड्या आणि 300 होमगार्ड तौनात आहेत.