अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याच्या कारणावरून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने तब्बल 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खर्चामध्ये कपात करण्यासाठी शहरी भागातील या शाखांना आता टाळे लागणार असल्याची माहिती, बँकेच्या पुणे येथील मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. 9600 कोटींच्या बुडीत कर्जांमुळे बँक 1200 कोटींचा तोटा सहन करीत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी बँकेने खर्च कपात सुरू केली आहे.
शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत बँक ऑफ महाराष्ट्र’चे फार मोठे जाळे आहे. संपूर्ण राज्यात बँकेच्या 1900 शाखा आहेत. राज्यातील कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं आतापर्यंत शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे असं पाऊल उचलणारी बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्यातील पहिलीच बँक आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 35 शाखा बंद होणार आहेत.
बंद होणाऱ्या शाखांमधील ग्राहकांची खाती जवळच्या शाखांमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यानंतर बंद करण्यात आलेल्या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड रद्द करण्यात येतील. बंद होणाऱ्या शाखांमधील ग्राहकांनी त्यांचे चेकबुक 30 नोव्हेंबरपूर्वी जमा करावे असे बँकेने सांगितले आहे. त्यानंतर सर्व बँकांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड रद्द केले जातील.
बंद होणाऱ्या शाखा -
ठाणे (7), मुंबई (6), पुणे (5), जयपूर (4), नाशिक (3), अमरावती, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, सातारा (प्रत्येकी 2), सोलापूर, कोल्हापूर (प्रत्येकी 1).