Sada Sarvankar | (Photo Credits: Facebook)

सप्टेंबर 2022 महिन्यात गणेश मिरवणूकीमध्ये दादर पोलिस स्टेशन (Dadar Police Station) जवळ झालेल्या गोळीबारामध्ये आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्याच लायसन्स्ड बंदुकीमधून गोळी सुटली असल्याचा बॅलेस्टिक रिपोर्ट आता समोर आला आहे. दरम्यान शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे.

पोलिस ऑफिसरच्या माहितीनुसार,' आम्ही सदा सरवणकर यांची पिस्तुल ताब्यात घेतली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर कलिना येथील फॉरेंसिक लॅबमध्ये ती पाठवली आहे. दरम्यान पोलिस स्टेशन परिसरामध्ये जी शेल मिळाली आहे ती त्याच पिस्तुलामधील आहे. ' यावेळी पोलिसांनी असं देखील सांगितलं आहे की एसयूव्ही मधून पिस्तुल आणताना त्याच्यातून मिसफायर झालं आहे. सरवणकरांनी मात्र आपल्याला या गोष्टीबद्दल माहिती नाही. ती गोळी चुकून सुटली असल्याचं म्हटलं आहे.

11  सप्टेंबरच्या रात्री काय घडलं होतं? 

11 सप्टेंबरच्या रात्री सरवणकरांच्या निकटवर्तीय संतोष तेलवणे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर उद्धव ठाकरे समर्थकांवर टीका केली. यामधून ठाकरे समर्थक महेश सावंत यांनी तेलवणे यांना प्रभादेवी मध्ये भेटायला बोलावलं. दोन्ही कडून समर्थक आले आणि ते भिडले. या घटनेची दखल घेत हा प्रकार दंगल घडवणारा असल्याचं सांगत सावंत आणि त्यांच्या 25 समर्थकांविरूद्ध पोलिसांत तक्रार झाली त्यामध्ये त्यांना अटकही झाली. दरम्यान यानंतर ठाकरे गटाकडून अनिल परब, अरविंद सावंत, आंबादास दानवे, सुनिल राणे, सचिन अहिर यांनी पोलिस स्टेशन गाठत त्यांच्या सुटकेसाठी मध्यस्थी केली.

सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान आणि त्यांचे समर्थक तेलवणे, कुणाल वाडेकर आणि इतरांविरुद्ध शस्त्र कायदा 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की वाचा: MLA Sada Sarvankar: आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त पिस्तूलाची होणार फॉरेन्सिक चाचणी; अडचणी वाढण्याची शक्यता .

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेकदा ठाकरे विरूद्ध शिंदे गट एकमेकांसमोर आले आहेत. सदा सरवणकर हे दादर मधील आमदार असून फूटीनंतर ते एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत. तर त्यांचा मुलगा समाधान देखील स्थानिक नगरसेवक आहे.