Balasaheb Thorat | (Photo Credits: Facebook)

औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याच्या आणि राज्यातील इतर शहरांच्या नामांतराच्या चर्चेवरुन काँग्रेस पक्ष (Congress Party ) आक्रमक झाला आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ट्विटरद्वारे तशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासोबतच महाविकासआघाडी सरकारला किमान समान कार्यक्रमावरुन इशाराही दिला आहे. त्यामुळे शहरांच्या नामांतराचा मुद्दा हा महाविकासआघाडी सरकारसाठी केवळ मतभेदाचा ठरतो की एकूण सरकारच्या अस्तित्वाबाबतच कळीचा ठरतो यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

महाविकासआघाडी सरकारला इशारा

बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

काँग्रेसने शहरांच्या नामांतराला या आधीही विरोध केला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाचे मंत्री हरदीप सिंह पूरी यांना एक स्मरणपत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी औरंगाबाद विमानतळाचे नामांतर करुन ते छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावे असे म्हटले आहे. या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सदर विमानतळाचे नाव बदलण्याबाबत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने ठराव पास झाला असून तसा निर्णयही घेण्यात आला आहे, असे स्मरण करुन दिले आहे. (हेही वाचा, Chhatrapati Sambhaji Maharaj Airport: औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र)

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे यासाठी शिवसेना प्रचंड अग्रही आहे. भारतीय जनता पक्षानेही तशीच अनुकूल भूमिका व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने तर थेट तारीखच दिली आहे. विशिष्ठ तारखेपर्यंत औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा या पक्षाने दिला आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली आहे. तर काँग्रेसने मात्र थेट विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामंळे औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे पुढे आल आहे. हे मतदभेद कमी होऊन एकमुखी निर्णय होणार की, थेट आघाडीत बिघाडी होणार हे येणारा काळच सांगणार आहे.