Chhatrapati Sambhaji Maharaj Airport: औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र
Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

औरंगाबाद (Aurangabad) की संभाजीनगर (Sambhajinagar) हा वादा सुरु असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारला एक स्मरणपत्र धाडले आहे. हे पत्र केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री (Union Civil Aviation Minister) हरदीप सिंह पूरी (Hardeep Singh Puri) यांना लिहिले आहे. या पत्रात औरंगाबाद विमानळाचे (Aurangabad Airport) नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ (Chhatrapati Sambhaji Maharaj Airport) असे करावे या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. तसेच, या निर्णयाची अधिसूचना शक्य तितक्या लवकर काढावी असेही या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला लिहिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज करण्यात यावे असा ठराव महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केला आहे. हा ठराव अर्थसंकल्पीय अधिवेशना मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिव स्तरावरुन केंद्रीय मंत्रालयाशी संपर्क साधून तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबत तातडीने करण्यात यावे. तसेच, याबाबत शक्य तितक्या लवकर हा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (हेही वाचा, Aurangabad or Sambhaji Nagar: औरंगाबाद की संभाजीनगर? महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेदाची शक्यता; नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध)

राजकीय वर्तुळात गरमागरमी

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे यासाठी शिवसेना प्रचंड अग्रही आहे. भारतीय जनता पक्षानेही तशीच अनुकूल भूमिका व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने तर थेट तारीखच दिली आहे. विशिष्ठ तारखेपर्यंत औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा या पक्षाने दिला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली आहे. तर काँग्रेसने मात्र थेट विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामंळे औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे पुढे आल आहे. हे मतदभेद कमी होऊन एकमुखी निर्णय होणार की, थेट आघाडीत बिघाडी होणार हे येणारा काळच सांगणार आहे.

औरंगाबाद की संभाजीनगर हा वाद तसा खूप जुना आहे. साधारण 1988 मध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करा अशी जाहीर मागणी केली. तेव्हापासून हा विषय वादग्रस्त ठरला आहे. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेत तसा ठरावही झाला इतकेच नव्हे तर मनोगर जोशी मुख्यमंत्री असताना युती सरकारने त्याबाबत निर्णयही घेतला होता. परंतू, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि हा निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावा लागला. तेव्हापासून हा विषय अद्यापही प्रलंबीत राहिला आहे.