Balasaheb Thorat | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा (Aurangabad Name Change) मुद्दा चांगलाच पेटला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकमत नसल्याचे दिसत आहे. शिवसेना (Shiv Sena) गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी करत असताना महाविकास आघाडीत मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून (Congress) याला विरोध दर्शवला जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाना अग्रलेखातून सेक्युलरवादावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. या टीकेनंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल थोरात यांनी शिवसेना-भाजपाला केला आहे. हे देखील वाचा- औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबत निर्णय याआधीच घेण्यात आला आहे- खासदार संजय राऊत

ट्विट-

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यातकडे जनता करमणूक म्हणून बघते आहे. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.