राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व बदलणार अशी चर्चा सुरु असताना आता त्यासंदर्भात स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. यामुळे राज्य सरकारमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात होतील. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न आहेच. मात्र त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे सोपवण्यात येईल आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल. विशेष म्हणजे या प्रस्तावाला दोन्ही पक्षांची आणि मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी काँग्रेस पक्षातील कोणत्या मंत्र्याकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे. यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या तिघांची नावे चर्चेत आहेत. यात बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आहे.
परंतु, उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. त्यांच्या निर्णयानुसार आम्ही कामं पुढे नेत आहोत. मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल होत असतील तर त्यात कुणी पडण्याचे कारण नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळात आपला सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या ज्या मंत्र्याची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी त्या मंत्र्याचे खाते पटोले यांच्याकडे सोपवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर का?
काँग्रेसने विधानसभा निवडणूक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती. काँग्रेस पक्ष सत्तेत असण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसंच महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत समन्वय ठेवण्याचे काम थोरात यांनी केले आहे. या सर्व गोष्टींमुळे थोरात यांचे पारडे जड आहे.