अमरावतीच्या (Amravati) विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी काल भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांची उमेदवारी देखील निश्चित झाली आहे. महायुती सरकारमधले मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मात्र राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. त्यांच्या विरोधाला डावलत भाजपाने नवनीत राणाला तिकीट दिल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी देखील अमरावतीच्या लोकसभा जागेवर हक्क सांगत नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. (हेही वाचा - Amravati Lok Sabha Election: भाजपकडून अमरावतीतून नवनीत राणाला उमेदवारी जाहीर, बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष)
मागील काही दिवसांपासून नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. भाजपने अमरावतील लोकसभेतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर राणा यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. दुसरीकडे नवनीत राणा यांच्या प्रवेशानंतर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही काही करुन नवनीत राणांना पाडणार असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. सोबतच 1 -2 जागी भाजपाचा पराभव झाल्याने त्यांना कोणताचा फरक पडणार नसल्याचे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.
नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिल्यास आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. राणा दाम्पत्याला पैशांचा माज आहे, अशी घणाघाती टीकाही बच्चू कडू यांनी केली होती. दरम्यान, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.