नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावतीतून (Amravati Lok Sabha Election) उमेदवारी जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे नवनीत राणा (Navneet Rana) कमळावर लढणार हे स्पष्ट झालं आहे. नवनीत राणा अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपने (BJP) आज सातवी यादी जाहीर केली असून यामध्ये नवनीत राणा यांच्या नावाचा देखील समावेश आहे. नवनीत राणा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या तातडीने नागपूरसाठी (Nagpur) रवाना झाल्या आहेत. महायुतीचा एक घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. यामुळे आता ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.  (हेही वाचा - Sangli Lok Sabha Seat: सांगलीच्या जागेवरुन खडाजंगी सुरुच, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक)

अमरावतीत आनंदराव अडसूळ, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ही राजकीय आत्महत्या असल्याचे आनंदराव अडसूळ म्हणाले. तर 100 टक्के नवनीत राणा यांना पाडणार असं बच्चू कडू म्हणाले. आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीत सर्व ठिक नसल्याचे समोर आले आहे.

भाजप अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. भाजपच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अमरावती लोकसभा जागेवर कमळ चिन्हावर निवडणूक होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद अडसूळ यांचा पराभव करून अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता.